सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल प्रति लिटर ११८ आणि डिझेलही शंभर रुपयांवर गेले आहे. पुढच्या काही दिवसांत १२५ रुपये आणखी काही दिवसांनी १५० रुपयेसुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लगावला. महागाईची झळ सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. याचा गांभीर्याने विचार केंद्र सरकारने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना पाटील म्हणाले, क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला जाऊन आले. त्यावेळी भारताचा दारुण पराभव झाला. त्यावेळी त्यांनी सांगितले, आम्हाला ११ खेळाडूंच्या नाही तर १३ खेळाडूंच्याविरोधात खेळायला लागले. कारण दोन पंचदेखील आमच्या विरोधात होते, असे वाडेकर म्हणाले होते. त्याच पद्धतीने केंद्र सरकारची ईडी आणि सीबीआय आमच्या विरोधात आहेत. त्यामुळे तसाच प्रकार देशात चालू आहे, असा टोला त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.महागाईच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, शेजारच्या देशात महागाईची जी परिस्थिती झाली आहे. त्याठिकाणी नियोजनबद्ध असे काही नाही. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतात १९९१ पासून आदर्श अशी अर्थव्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे कोणताही परिणाम भारताला सोसावा लागला नाही. पेट्रोल, डिझेलच्या किमती जगात वाढल्या, तरीही भारतात लगेच वाढत नव्हत्या. महागाई आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह फंड ठेवला होता. आज तीच व्यवस्था चालू असती, तर भारतातील नागरिकांना सध्याची महागाईची झळ बसली नसती.कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल महाग कसे?कर्नाटक राज्यापेक्षा महाराष्ट्रात प्रति लिटर दहा रुपये पेट्रोल महाग कसे? असा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांना विचारला. यावर त्यांनी स्मित हास्य करुन या प्रश्नाला बगल देत तेथून निघून जाणेच पसंत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेनं पेट्रोल १५० रुपयांवरही जाईल - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 5:56 PM