सांगली : पोस्ट विभागासह शासनाच्या विविध खात्यांत नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना ३२ लाखांचा गंडा घालणाऱ्या संशयिताला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. वैभव अण्णासाहेब बंडगर (मालगाव रस्ता, आवटी पेट्रोलपंपानजीक, मिरज) असे संशयिताचे नाव आहे. त्याने आठ तरुणांना गंडा घातल्याची तक्रार दाखल झाली होती. दरम्यान बंडगर याला अटक होताच आणखी काही तक्रारी दाखल झाल्या आहेत.याबाबत अतुल ऊर्फ सागर सुरेश ओमासे (रा. पंचशीलनगर, वाडीकर चाळ, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी ओमासे शहरातील खासगी कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. संशयित वैभव बंडगर याचे कवलापूर येथे अक्षरदीप फाउंडेशन ट्रस्ट तसेच अक्षरदीप शिक्षण संस्था आहे. या माध्यमातून त्याने वरिष्ठ पातळीवर ओळखी असून काही लाख रुपये दिल्यास विविध शासकीय पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवून आठ जणांनी बंडगर याला वेळोवेळी ३२ लाख रुपये दिले होते.हा फसवणुकीचा सर्व प्रकार मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विश्रामबाग परिसरात घडला. संशय येऊ नये याकरिता बंडगरने पोस्ट विभागात नोकरीची बनावट नियुक्तीपत्रे दिली. त्याच्यावर डिजिटल शिक्का व बनावट स्वाक्षरी केली. पोस्टामधून नोकरीसाठी बोलावणे न आल्याने फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. त्यांनी संशयित बंडगर याच्याकडे पैशाची मागणी केली. त्याने स्वत: तसेच नातेवाइकांकरवी फिर्यादीसह अन्य सात जणांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी संशयितास मंगळवारी अटक केली.फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरातबंडगर याने आठ तरुणांना ३२ लाखांना गंडा घातला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच आणखी काही तरुणांनी फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे फसवणुकीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या बंडगरला अटक, फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:41 AM