सांगली : कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर आणि भितीदायक असल्याचे निष्कर्ष वैद्यकीय क्षेत्राला आढळले आहेत. संसर्ग झाल्याच्या तीन-चार दिवसांतच रुग्णाची प्रकृती गंभीर बनत असल्याची माहिती भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख यांनी दिली.या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूची संख्याही जास्त दिसत आहे. यावर डॉ. देशमुख म्हणाले की, दुसरा म्युटन्ट गंभीर असल्याचे दिसत आहे. पहिल्या लाटेवेळी संसर्ग झाल्यावर सहा-सात दिवसांनी रुग्णांची प्रकृती गंभीर व्हायची, पण सध्याच्या लाटेत तिसऱ्या चौथ्या दिवशीच अत्यवस्थ होते. त्याचे नेमके कारणही कळत नाही. ऑक्सिजन पातळीबाबतही अशीच निरिक्षणे आहेत.
एखाद्या रुग्णाची सामान्य असलेली ऑक्सिजन पातळी काही तासांतच खालावण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे रुग्णांची अधिक काळजी घ्यावी लागत आहे. संसर्ग दिसल्यानंतरही रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. प्रकृती गुंतागुंतीची झाल्यावर रुग्णालयात येत आहेत, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांनी संसर्ग दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औैषधोपचार सुुरु करायला हवेत.ते म्हणाले की, पहिल्या लाटेत कुटुंबातील एखादी व्यक्ती बाधित झाली तर अन्य सदस्यांना संसर्गाचे प्रमाण कमी होते. या लाटेत मात्र संपूर्ण कुटूंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या दुसर्या म्युटेन्टचे हे परिणाम आहेत. त्यामुळेही जिल्ह्याची रुग्णसंख्या जास्त दिसत आहे.