महालिंग सलगर ल्ल कुपवाड जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४२ हजार ७९ हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे़, तर वन्यजीव विभागाकडे १२ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे़ जिल्ह्यातील बागायती भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत हे वनक्षेत्र पाच टक्केसुद्धा नाही़ त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या पर्यावरणाचा निकष जोपासण्यासाठी असणारी ३३ टक्के वनक्षेत्राची अट गाठणे कठीण आहे़ खासगी व पडिक जमिनीचा आधार घेतल्याशिवाय हे उद्दिष्ट साध्य करू शकणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे़ तसेच रोहयोअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शतकोटी वृक्षलागवड योजनेत वनविभाग अग्रेसर असून, इतर विभाग पावसाचा आधार घेत आहेत़ जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने मागील तीन वर्षांपासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविली जात आहे़ या योजनेअंतर्गत मागील वर्षी ४२ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती़ मागील वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे प्रशासनाने राबविलेल्या शतकोटी वृक्षलागवड योजनेला चांगले यश मिळाले़ वनविभागासह इतर विभागाच्या वृक्षलागवडीतील ८० टक्केहून अधिक रोपे जगविण्यात यश मिळाले़ यापूर्वी रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या जवळपास होते़ ही बाब वन विभागाच्या मे महिन्यातील सर्वेक्षणातून उजेडात आली आहे़ मागील वर्षी जानेवारीपासून मे पर्यंत पावसाने दिलासा दिला होता़ त्यामुळेच रोपे जिवंत राहण्यास मदत मिळाली होती़ वृक्ष लागवड आणि संरक्षणात अग्रेसर असलेल्या वन विभागाने मागील वर्षी १७ लाख रोपांची लागवड केली होती़ त्यातील १४ लाख रोपे जगविण्यामध्ये त्यांना यश आले होते़ यंदाही पावसाने उशिरा परंतु जोरदार सुरूवात केली आहे़ त्यातच वन विभागाला यंदा १५ लाख ८७ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ सामाजिक वनीकरण विभागाला २ लाख ३८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे़ जिल्हा परिषदेलाही १५ लाख ८७ हजाराचे उद्दिष्ट असून, इतर विभागांनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये सर्व विभागांपैकी वन विभागाने फक्त वृक्षलागवडीत आघाडी घेतली असून, उद्दिष्टापैकी ७ लाख ५६ हजार रोपांची लागवड त्यांनी पूर्ण केली आहे़ इतर विभाग मात्र पावसाच्या लहरीपणाचे कारण पुढे करीत असल्याचे समजते. येत्या महिन्याभरात शतकोटी योजनेचे उद्दिष्ट पूर्णत्वास येईल़ तसेच यावर्षीही या योजनेस यश मिळेल, असे वन विभागाचे सहायक वनसंरक्षक के. जी़ मुजावर यांनी सांगितले़
खासगी क्षेत्राच्या आधाराशिवाय वनक्षेत्र वाढणे अशक्यच!
By admin | Published: July 22, 2014 11:11 PM