घनशाम नवाथे/ लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मार्केट यार्डातील दुकान फोडून रोकड लांबवणाऱ्या राधा मार्तंड माळी (वय २५, रा. नवीन रेल्वे स्टेशनसमोर, वांगीकर प्लॉट, वडर कॉलनी, सांगली) या महिलेस विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ५७ हजार ५०० रुपये जप्त केले.
अधिक माहिती अशी, केतन अण्णासाहेब खोकले (वय ४५, रा. गांधी कॉलनी, विश्रामबाग) यांचे वसंतदादा मार्केट यार्डात पहिल्या गल्लीत ए.के. इंडस्ट्रीज नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास दुकानाच्या छताचा पत्रा कापून राधा माळीने दुकानात उतरून टेबलाचे ड्रॉव्हर फोडले होते. त्यातील रोकड घेऊन तिने पलायन केले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रीत झाला होता. खोकले यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस कर्मचारी बिरोबा नरळे व संकेत कानडे यांना खबऱ्यामार्फत राधा माळीने चोरी केल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांच्या पथकाने राधा माळीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच घरात लपवून ठेवलेले ५७ हजार ५०० रुपये पोलिसांना काढून दिले. तिला न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे, उपनिरीक्षक पोवार, कर्मचारी नरळे, अमर मोहिते, संदीप साळुंखे, कानडे, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, प्रशांत माळी, योगेश पाटील, सुनील पाटील, बाळू मोरे यांच्या पथकाने कारवाई केली.