कुपवाड : कारखान्यातील इतर सहकारी कामगारांसोबत बोलल्याचा संशय आणि पोलिसांत तक्रार दिल्याच्या राग मनात धरून शहरातील दुर्गानगरमधील सीमा राजू नाईक (३०, रा. दुर्गानगर) या विवाहित महिलेच्या अंगावर तिघांनी रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कुपवाड पोलिसांनी याप्रकरणी संशयित मुख्य सूत्रधार सतीश शंकर शिंदे (३०, रा. दुर्गानगर), नितीन शंकर शिंदे (२५, रा. संजय गांधी झोपडपट्टी, मिरज) व पोपट नानासाहेब शिंदे (३९, रा. सिद्धेवाडी, ता. मिरज) या तिघांना शनिवारी अटक केली आहे. यातील सतीश व नितीन दोघे सख्खे भाऊ असून, पोपट त्यांचा नातलग आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित सतीश व जखमी सीमा नाईक हे दोघे मिरज एमआयडीसीतील एका पॉवरलूम कंपनीत गेल्या दोन वर्षापासून एकत्र काम करत आहेत. तेव्हापासून दोघांची ओळख वाढली होती. सीमा सध्या पतीपासून विभक्त राहत आहे. त्यामुळे सतीशने सीमासोबत ओळख वाढवली होती. तशातच सीमा कंपनीतील इतर कामगारांसोबत बोलत असल्याचा सतीशला राग येत होता. यावरून दोघात वारंवार खटके उडत होते. या त्रासातून तीने पोलिसात तक्रार दिली होती.दरम्यान, कारखान्यातील इतर सहकारी कामगारांसोबत बोलल्याचा संशय आणि पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून ४ एप्रिल २०१८ रोजी दुपारी दीड वाजता सतीश, नितीन व पोपटने संगनमत करुन प्लॅन तयार केला. त्यानंतर सतीश व नितीन या दोघांनी पोपटच्या घरातून रॉकेलचा कॅन आणून सीमाच्या राहत्या घरी जाऊन 'तू कंपनीतील इतर कामगारांशी का बोलतेस? आणि आमच्या विरोधात पोलिसात तक्रार का देतेस? असे विचारुन तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेत संबंधित महिला ५० टक्के भाजून गंभीर जखमी झाली आहे. तिचा जबाब नोंदविल्यानंतर शनिवारी १७ दिवसानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल झाला.
तिच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत जखमी महिलेने संशयिततिघांविरोधात कुपवाड पोलिसात तक्रार दिली आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहा. पोलीस निरीक्षक रूपाली कावडे तपास करीत आहेत.