सांगली : वाहन चोरीची तक्रार नोंद करून घेत नसल्याने संजयनगर पोलीस ठाण्यासमोर महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुशीला कृष्णा जाधव असे महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, जाधव व तिच्या बहिणीचा मुलगा विक्रम गोसावी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चिकली येथील अभिजित लोहार यांच्याकडून पिकअप चारचाकी वाहन नोटरी करून खरेदी केले होते. या वाहनावर चार लाखांचे कर्ज होते. कर्जाचे हप्ते थकल्याने लोहार यांनी सोमवारी दुपारी वाहनाचा ताबा घेतला. त्यानंतर जाधव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच वाहनात ५० हजारांची रोकड, बारा पोती लसूण, सिलिंडर, शेगडी, भांडी असे साहित्य होते, असा दावाही केला. लोहार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करीत त्या संजयनगर पोलीस ठाण्यासमोर आल्या. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले.
चौकट
आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील म्हणाले की, लोहार व विक्रम गोसावी यांच्यात वाहनाचा करारनामा झाला होता. त्यानुसार कर्जाचे हप्ते थकल्यास वाहन परत नेणार असल्याची अटही करारात घातली होती. मध्यंतरी लोहार यांनी हप्ते थकल्याने वाहनांना नवीन ग्राहक शोधले, विक्रम यानेच त्यांना वाहन परत घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार लोहार यांनी वाहन नेले. जाधव यांनी खोटी माहिती देऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात चौकशी सुरू होती. त्यातच त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांनी वाहनात ५० हजार रुपये नसल्याची कबुलीही दिल्याचे सांगितले.