करगणी : दिघंची-हेरवाड महामार्गावर शेटफळे ते आटपाडीदरम्यान सचिन पाटीनजीक शेटफळेतील एका महिलेचा अपघात झाला हाेता. गंभीर अवस्थेत पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या सिंधुताई तुकाराम गायकवाड यांचे मंगळवारी निधन झाले. बेजबाबदारपणे राज्य महामार्ग फोडून केलेल्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामामुळेच सिंधुताई गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा आराेप करत महामार्गाचे काम करणारी राजपथ कंपनी व बंदिस्त पाईपलाईनच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
आटपाडीहून जात असणारा दिघंची-हेरवाड महामार्ग सुरुवातीपासूनच अनेक वादाने ग्रासलेला आहे. यातच आटपाडी ते शेटफळेदरम्यान सचिन शेती फार्मनजीक महामार्ग पूर्ण झाल्यानंतर टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी खुदाई करत महामार्ग फोडण्यात आला. यावेळी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली गेली नव्हती. महामार्ग खोदल्यानंतर लगेच दुरुस्ती करणे अपेक्षित असताना, आजअखेर महामार्ग फाेडलेलाच आहे. महामार्गावरच मोठा मुरूम टाकून चढ केल्यानेच सिंधुताई गायकवाड गाडीवरून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
गायकवाड यांच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून पती व पत्नी असे दोघेच राहत हाेते. गावातील काही दानशूर मंडळी व नातेवाईकांनी पाच ते सहा लाख रुपये जमा करून त्यांच्या औषध उपचाराचा खर्च भागवला. बंदिस्त पाईपलाईन करणारा ठेकेदार व राजपथ कंपनी यांच्यामुळेच सिंधुताई गायकवाड यांचा बळी गेल्याचा आराेप हाेत आहे.
काेट
बंदिस्त पाईपलाईन करणारा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाेंगळ कारभाराने सिंधुताई गायकवाड यांचा बळी घेतला आहे. संबंधीत विभागावर प्रशासनाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सिंधुताई गायकवाड यांना न्याय द्यावा.
- गौरीहर पवार
सामाजिक कार्यकर्ते, शेटफळे