सांगली: तिसरे अपत्य असल्याची माहिती लपविल्याबद्दल माधवनगर येथील पूनम गजानन होनवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रद्द केले. त्यामुळे शिवाजी डोंगरे गटाला धक्का बसला आहे. माधवनगर ग्रामपंचायतच्या वाॅर्ड क्रमांक पाचमधून पूनम गजानन होनवार या डोंगर गटाच्या पॅनेलमधून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विरोधात याच प्रभागातील प्रतिस्पर्धी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रेखा रामचंद्र शेंडे यांनी निवडणूक लढविली होती. निकालानंतर शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनम होनवार यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १४ (१)मधील खंड (ज-१)नुसार तीन अपत्य असल्याची तक्रार केली होती.
या तक्रार अर्जावर तीन सुनावण्या घेण्यात आल्या. तक्रारीबरोबरच पूरक कागदपत्रे रेखा शेंडे यांनी सादर केली होती. त्या कागदपत्रानुसार व दाखल अपीलानुसार सौ. पूनम होनवार यांनी तिसरे अपत्य असल्याची माहिती लपविल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले. यासाठी शिवसेना व स्थानिक माधवनगर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.
अपीलासाठी १५ दिवसांची मुदतहोनवार यांना निकालाविरोधात पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार आहे. त्यासाठी १५ दिवसांची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाद्वारे दिली आहे.