सांगली : वेळ दुपारी एकची... आदिसागर कोविड सेंटरमधील एका ३४ वर्षीय महिलेची ऑक्सिजन पातळी खालावली. सेंटरमधून महापालिकेच्या रुग्णवाहिका चालकाला कॉल गेला. त्याने तातडीने रुग्णवाहिका सेंटरच्या दारात उभी केली. अवघ्या अकरा मिनिटात त्याने आदिसागर सेंटर ते मिरज शासकीय रुग्णालयापर्यंत २० किलोमीटरचे अंतर पार करुन महिलेला उपचारासाठी दाखल केले आणि तिचे प्राण वाचविले.लाला मुरसल असे या रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. त्याच्या या प्रसंगावधानाचे आयुक्त नितीन कापडणीस यांनीही कौतुक केले आहे. लाला मुरसल हे महापालिकेच्या रुग्णवाहिकेवर चालक आहेत. कोविडच्या काळात आणि आतापर्यंत एक हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरपर्यंत पोहचविले आहे.
बुधवारी दुपारी एकच्या सुमारास मुरसल हे नेहमीप्रमाणे आदीसागर कोविड सेंटरच्या बाहेर ड्युटी बजावत होते. त्यांना कोविड सेंटरमधून इमर्जन्सी असल्याचे सांगताच त्यांनी तातडीने रुग्णवाहिका सज्ज ठेवली. आदीसागरमधील एका ३४ वर्षीय महिलेची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना तातडीने मिरज सिव्हीलला दाखल करायचे होते.
मुरसल यांनी महिला रुग्णाला ऑक्सिजनसहित रुग्णवाहिकेत घेतले आणि मिरज सिव्हीलच्या दिशेने सायरन वाजवत पळवली. अवघ्या ११ मिनिटात मुरसल यांनी मिरज सिव्हिल गाठले आणि महिलेला उपचारासाठी दाखल केले. वेळेत रुग्णवाहिका पोहोचल्याने या महिलेला व्हेंटिलेटर लावता आला आणि तिचा जीवही वाचवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. लाला मुरसल यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.