सांगली , दि. १३ : हलाल चित्रपट प्रदर्शित करावा, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यास जागा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्र विकास सेनेच्या वर्षा कोळी यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी वर्षा यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
वर्षा जनार्दन कोळी (वय ४०, मगदूम, सोसायटी, जयसिंगपूर, ता. शिरोळ), सुधाकर रावजी गायकवाड (४०, बेथेलहेमनगर) व अमोस शमवेल मोरे (४०, शांतीनगर, खणभाग, सांगली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही दुपारी सव्वाबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले.वर्षा काळे यांच्या हातात पिशवी होती. यामध्ये त्यांनी रॉकेलचा कॅन ठेवला होता. हलाल चित्रपट आजच्या आज प्रदर्शित करा, लोकांना आंदोलन करण्यास जागा द्यावी, अशा घोषणा देत ते आले.
वर्षा कोळी यांनी अचानक पिशवीतून रॉकेल कॅन बाहेर काढला. त्या रॉकेल ओतून अंगावर घेणार, तेवढ्यात पोलिसांनी धाव घेतली. त्यांच्या हातातील कॅन काढून घेतला. तिघांनाही ताब्यात घेतले. सायंकाळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली. याप्रकरणी पोलिस शिपाई सागर देशिंगकर यांनी फिर्याद दिली आहे.