दत्ता पाटीलतासगाव : सांगली जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प स्तरावर अंगणवाडी मदतनीस या मानधनावरील पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील १२ बालविकास प्रकल्पांमध्ये २१५ गावांत २८५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र यामध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय झाला आहे. भरती प्रकियेत ‘एसईबीसी’चा समावेशच नसल्याने आरक्षणाच्या लाभापासून मराठा समाजातील अर्जदार वंचित राहणार आहेत.
यापूर्वी मराठा अर्जदारांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र २८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ‘एसईबीसी’मधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. तेंव्हापासून मराठा समाजाला राज्य स्तरावर ईडब्ल्यूएस दाखले मिळणे बंद झाले. सध्याच्या भरतीत ‘एसईबीसी’चा समावेशच नाही. त्यामुळे अंगणवाडी मदतनीस पदासाठी इच्छुक मराठा समाजातील महिला आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील १३ बाल विकास प्रकल्पांपैकी कवठेमहांकाळ वगळता अन्य १२ बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मानधन तत्त्वावर अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी पात्र महिला उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. बहुतांश प्रकल्पात अर्ज सादर करण्याची मुदत २ सप्टेंबरअखेर आहे.
राज्य शासनाच्या २ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी १०० गुणांचे निकष निश्चित केले आहेत. त्यापैकी ७५ गुण शैक्षणिक पात्रतेसाठी, तर अतिरिक्त २५ गुण जातीय प्रवर्ग आणि अनुभवासाठी निश्चित केले आहेत. जातीय प्रवर्गामध्ये ईडब्ल्यूएससाठी अतिरिक्त पाच गुण मिळणार आहेत. यापूर्वी या प्रवर्गातून मराठा समाजातील महिलांना लाभ मिळाला होता.
मात्र २८ जून २०२४ पासून मराठा समाजाला दाखले मिळणे बंद झाले आहे. वास्तविक या भरती प्रक्रियेत ‘एसईबीसी’चा समावेश होणे अपेक्षित होते. मात्र ही भरती प्रक्रिया जुन्याच शासन निर्णयानुसार होत असल्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदार अतिरिक्त गुणांच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. याबाबत मराठा समाजातून तीव्र पडसाद उमटत आहेत. ही भरती प्रक्रिया रद्द करावी आणि एसईबीसीचा समावेश करून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी होत आहे.
असा आहे गुणांकन लाभ
- विधवा, अनाथ : दहा गुण.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती : दहा गुण.
- इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग : पाच गुण.
- अंगणवाडी सेविका/ मदतनीस म्हणून दोन वर्षे कामाचा अनुभव : पाच गुण.
ना घर.. ना घाट
- मराठा समाजाला २८ जून २०२४ पूर्वीपर्यंत ईडब्ल्यूएसमधून आरक्षणाच्या लाभ घेता येत होता. मात्र शासनाने २८ जून २०२४ रोजी शुद्धीपत्रक काढून मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे दाखले मिळणे बंद झाले. त्यामुळे ईडब्लूएस ऐवजी एसईबीसीमधून फक्त मराठा समाजाला आरक्षणाची संधी उपलब्ध झाली.
- मात्र अंगणवाडी मदतनीस भरतीत ईडब्ल्यूएससाठी लाभ देण्यात आला आहे. मात्र एसईबीसीसाठी कोणताही लाभ नाही. त्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशीच झाली आहे.
शासन स्तरावरून आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि शासन निर्णयानुसारच अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया बाल विकास प्रकल्प स्तरावर होत आहे. - संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग.
प्रकल्पनिहाय गाव आणि पदसंख्याप्रकल्प - गावे - पदसंख्याआटपाडी - १४ - २८तासगाव - ४२ - ७५मिरज - २१ - २८खानापूर - १३ - १५जत - २९ - २९उमदी ३० - ३०कडेगाव २३ - २८सांगली १६ - २२वाळवा(१) - ०१ - ०४वाळवा(२) - ०१ - ०१शिराळा - २३ - २३पलूस - ०२ - ०२एकूण - २१५ - २८५