रांजणी : रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील सुभेदार वस्तीवर अचानक आग लागून झोपडीत झोपलेल्या शहिदाबी अकबर सुभेदार (वय ४०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा इकबाल (१८) गंभीर जखमी झाला. शनिवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. आगीत झोपडीतील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. रांजणी येथील सुभेदार वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. सुभेदार यांची घरे रस्त्याच्या बाजूला आहेत. अकबर सुभेदार यांची शेती रस्त्याकडेला आहे. त्यांच्या शेतामध्ये पत्र्याचे शेड आहे आणि त्याच्या चारी बाजूने गवताच्या पाल्याचे कूड घातले आहे. याच पत्र्याच्या शेडमध्ये अकबर, पत्नी शहिदाबी आणि मुलगा इकबाल राहतात. अकबर बाहेरगावी गेले होते. घरी शहिदाबी व त्यांचा मुलगा इकबाल दोघेच होते. शनिवारी दोघे झोपेत असताना पहाटेच्या दरम्यान अचानक पत्र्याच्या कुडाला आग लागली. चारही बाजूने आगीने वेढल्याने तसेच धुराचे लोट असल्याने या दोघांना बाहेर पडता आले नाही. शहिदाबी आगीत जागीच ठार झाल्या, तर मुलगा इकबाल आईला वाचविण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झोपडीत विजेची सोय नसल्याने रॉकेलचा दिवा सुरू होता. मांजराने दिवा पाडला असावा, असा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या आगीत शहिदाबी यांची एक शेळीही जळून खाक झाली आहे. घरातील संसारोपयोगी साहित्य जळाले असून, सुभेदार कुटुंबियांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी कबीर सूर्यवंशी, व तलाठी बी. बी. लवटे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे. हवालदार संजय जाधव अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
रांजणी येथे आगीत महिला ठार
By admin | Published: December 27, 2015 12:09 AM