सांगली : यंत्रात साडीचा पदर अडकल्याने महिला कर्मचारी ठार झाली. गिरिजा पोळ (वय ४०, रा. कुपवाड) असे तिचे नाव आहे. कुपवाड एमआयडीसीतील गॅलक्सी केबल या अॅल्युमिनीयमची तार बनविण्याच्या कारखान्यात शनिवारी सकाळी ही घटना घडली. घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद आहे. गिरिजा पोळ यांचे कर्नाटक सासर आहे. दोन वर्षापूर्वी पतीचे निधन झाले होते. त्यामुळे त्या दोन मुलांसह उदरनिर्वाहासाठी कुपवाड येथे माहेरी आल्या होत्या. गेल्या काही महिन्यापासून त्या गॅलक्सी केबल या कारखान्यात सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होत्या. शनिवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कारखान्यात कामावर गेल्या होत्या. अन्य कामगार यंत्रे सुरू करुन काम करीत होते. गिरिजा एका सुरू असलेल्या यंत्राजवळ सफाईचे काम करीत होत्या. त्यावेळी त्यांचा साडीचा पदर यंत्रात गेल्याने त्या ओढल्या गेल्या. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथील सुरक्षारक्षक सुखदेव खोत धावत आले. त्यांनी हा प्रकार पाहून तातडीने यंत्र बंद केले. गिरिजा रक्तस्त्राव झाल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विच्छेदनानंतर मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे. रविवारी सकाळी नातेवाईक मृतदेह ताब्यात घेणार आहेत. (प्रतिनिधी)
कुपवाडला यंत्रात साडी अडकल्याने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2016 12:53 AM