सांगली : महिलांनी परिवाराप्रमाणे स्वत:चीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्वत: स्वच्छ राहण्याची सवय लावून घ्यावी. परिसर स्वच्छ ठेवायचा असेल, तर सर्वात प्रथम आपण आपल्यावरच प्रेम करायला शिकले पाहिजे, असे मत अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. महापालिकेच्या स्वच्छता अभियानांतर्गत येथील महावीर उद्यानात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, वंदना शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील, मृणाल पाटील, स्वरदा केळकर, अंजना कुंडले, कांचन भंडारे, पुष्पलता पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी कलाकारांनी नृत्य व गीताद्वारे शहर स्वच्छतेचा संदेश दिला. ताम्हणकर पुढे म्हणाल्या, शहर स्वच्छ ठेवायची जबाबदारी ही प्रत्येकाचीच आहे. याबाबत सर्वांनी दक्ष राहण्याची गरज आहे. ग्रामीण भागात शौचालय बांधण्यास ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. मी स्वच्छतेचे आवाहन कलाकार म्हणून नव्हे, तर सांगलीकर म्हणून करीत आहे. प्रत्येकजण स्वत:वर प्रेम करु लागेल, तेव्हा आपोआप पर्यावरण स्वच्छ होईल. यासाठी प्रत्येक नागरिकांने स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे. यावेळी नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, डॉ. अर्जुन ताटे, नगरअभियंता आर. पी. जाधव, बचत गटाच्या रेखा पाटील उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
महिलांनो, स्वत:वर प्रेम करा
By admin | Published: January 06, 2017 12:18 AM