सांगली पोलीस व महापालिकेतर्फे मिरजेत आयोजित महिला सक्षमीकरण, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह व स्वच्छ सर्वेक्षण या संयुक्त कार्यक्रम पार पडला. अधीक्षक गेडाम यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, महाविद्यालयीन युवती व नोकरदार महिलांनी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. महिला सर्व क्षेत्रात चोवीस तास कार्यरत असल्याने त्यांनी स्वतःजवळ संरक्षण साहित्य बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, अनेक ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सखी मंच स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांनी निर्भयपणे तक्रारी दाखल कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
निर्भया पथकाच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख म्हणाल्या, जिल्ह्यात सात ठिकाणी निर्भया पथके स्थापन करण्यात आली आहेत. एक उपनिरीक्षक व दोन कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून टवाळखोरांवर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका उपायुक्त स्मृती पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. स्वच्छतेबाबत महापालिकेचा देशात ३६ वा व राज्यात नववा क्रमांक आहे. पुढील काळात सांगली राज्यात प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास डॉ. ताटे यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस व महापालिका अधिकारी कर्मचारी, डॉक्टर उपस्थित होते.
फोटो-२१मिरज२