नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानकपणे महिला एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पिण्याचे पाणी बंद असल्याचे सांगून संताप व्यक्त केला.
गेल्या १५ दिवसांपासून गावाला पाणी नाही. ग्रामपंचायत प्रशासन काय करीत आहे? असा सवाल खुद्द विद्यमान ग्रामपंचायत सदस्या निला शेगावे यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्या लता कांबळे उपस्थित होत्या.
उपस्थित महिलांनी सरपंच राणी नागरगोजे व ग्रामसेविका उज्ज्वला आवळे यांना पाणी प्रश्नांचा भडीमार केला. यावर सरपंच राणी नागरगोजे यांनी येत्या दोन दिवसांत पाणी प्रश्न सोडविण्यात येईल असे सांगून गेल्या पंचवार्षिक संचालक मंडळाने सहा लाख रुपये विद्युत वितरणचे थकविल्याचे सांगितले.
दरम्यान, थकीत वीज बिलामुळे महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. परिणामी
गावातील सर्व पिण्याचा पाणीपुरवठा बंद पडला आहे.
गावापासून अवघ्या दीड कि.मी. अंतरावर म्हैसाळ प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी वाहत आहे. मात्र, पाणी उशाला अन् कोरड घशाला अशी ग्रामस्थांची स्थिती झाली आहे.