कोकरुड : वार्षिक पाणीपट्टी वेळेत भरूनही आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील अण्णा भाऊ साठेनगरमधील महिलांनी कळशी-घागरी घेत येळापूर ग्रामपंचायतीवर शुक्रवारी सकाळी मोर्चा काढला. सरपंच, उपसरपंच यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा मागे घेण्यात आला.
येळापूर ग्रामपंचायतीअंतर्गत नऊ वाड्या-वस्त्या आहेत. येळापूर वगळता सर्व ठिकाणी विस्तारित पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. सय्यदवाडी-कुंभवडेवाडी हा भाग वाॅर्ड तीनमध्ये येत असून या विभागाला मेणी ओढ्यात असणाऱ्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या विहिरीने तळ गाठल्याने या ठिकाणी मोठी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यातच आठ दिवसांनी येणारे पाणी अण्णा भाऊ साठेनगर येथे कमी दाबाने येत असल्याने अपुरे पाणी मिळत आहे. यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
सय्यदवाडी-कुंभवडेवाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेच्या विहिरीत पाणीच नसल्याने नळाला पाणी सोडले जात नाही. जसे पाणी साचेल तसा पुरवठा केला जाणार असून थोड्याच दिवसात गणेश पाणी पुरवठा योजनेचे पाणी या विहिरीत सोडून पाणी देऊ.
- दिनकर दिंडे, उपसरपंच, येळापूर.
वाडीतील राजकारणामुळे मोठमोठे नागरिक पाणीपट्टी न भरता दोन-तीन कनेक्शनला घरात मोटारी लावून पाणी भरतात. यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही. अशा नागरिकांवर ग्रामपंचायतीने कारवाई करावी.
- वजुबाई चांदणे, ग्रामस्थ, सय्यदवाडी