लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३० महिलांनी मंगळवारी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.
वांगीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गावाला १० दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागली. गळती काढून दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरु झाला. मात्र उत्तरेस असणाऱ्या आडातून निम्म्या गावासाठी छोटी पाणी योजना आहे. आडाचे पाणी आटल्याने योजनेचे लाभार्थी अडचणीत आले आहेत. प्रभाग ३ व ४ तसेच इंदिरानगर, हायस्कूल परिसराला एक दिवसआड १० मिनिटे पाणी पुरवले जाते. या भागाला पाण्याची अन्य व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायतीने नाथाच्या विहिरीचे पाणी नाल्याद्वारे या आडाजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी दूषित असून याचा वास येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. पिण्यासाठी योग्य असलेल्या टाकीचा पाण्याचा पाणी पुरवठा सुरु केल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेतली.
सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी मोर्चातील महिलांना घेऊन जेथे काम थांबले होते, तेथे जाऊन लोकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे ठेकेदारास आदेश दिले. काम तत्काळ सुरु करण्यात आले. जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत महिला कामावर उभ्या होत्या.
या विभागाचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी हायस्कूल परिसर व इंदिरानगरचा पाणीप्रश्न 'जैसे थे' आहे.
यावेळी सरपंच डॉ. विजय होनमाने, काशिनाथ तांदळे, यशवंत कांबळे, विक्रम लांडगे, उत्तम कांबळे, ग्रामविकास अधिकारी विकास सुतार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.