कऱ्हाड : कामानिमित्त शिवारात जाणाऱ्या महिलांचा खून करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्यास कऱ्हाड तालुका पोलिसांनी अटक केली. काशिनाथ गोरख काळे (वय २२, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे. आतापर्यंतच्या पोलीस तपासात त्याने वडोली-निळेश्वरमधील वृद्धेच्या खुनाची कबुली दिली असून, अन्य दोन महिलांचा खूनही त्यानेच केला असल्याचे तपासातून समोर येत आहे. वडोली-निळेश्वर येथील यशोदा शिवराम भोसले या वृद्धेचा ३० नोव्हेंबर रोजी ‘बडवे’ नावच्या शिवारात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. तालुका पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार सज्जन जगताप यांच्यासह पथकाने सर्व शक्यता गृहित धरून तपासाची चक्रे फिरविली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी या पथकाला तपासाबाबत सूचना केल्या. तपास सुरू असताना या प्रकरणात काशिनाथ गोरख काळे याचा हात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलीस त्याच्या शोधात होते. रविवार, दि. ७ रात्री काशिनाथ काळे कऱ्हाडातील प्रभात चित्रमंदिरात चित्रपट पाहण्यासाठी आला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचला. मात्र, काळे तेथून पसार झाला. त्यावेळी सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार सज्जन जगताप यांनी पाठलाग करून त्याला पकडले. रविवारी रात्रीपासून काशिनाथ काळेकडे या प्रकरणाबाबत कसून तपास सुरू होता. तपासादरम्यान त्याने वडोली-निळेश्वरमधील खुनाची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून चोरीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले. काशिनाथ काळेने लूटमारीच्या उद्देशाने अन्य दोन महिलांचा खून केल्याची माहितीही तपासातून समोर येत आहे. पोलिसांकडून त्याबाबतही कसून तपास केला जात आहे. (प्रतिनिधी कोयना पुलाजवळील खुनात हात कऱ्हाडच्या कोयना पुलाजवळ २१ सप्टेबर २०१३ रोजी लीलाबाई अण्णा पवार (वय ६५) या वृद्धेचा खून झाला होता. लीलाबाई पवार शेतात निघाल्या असताना अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार केले होते. या प्रकरणातही काशिनाथ काळे याचा हात असल्याचे उघड होऊ लागले आहे. पोलिसांचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
महिलांच्या खुनाचे गूढ उकलले! एकास अटक :
By admin | Published: December 08, 2014 11:54 PM