लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे धोकादायक बनलेली झाडे काढण्याचे काम उद्यान विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार प्रभारी उद्यान अधीक्षक गिरीश पाठक आणि त्यांच्या पथकाने ही कार्यवाही हाती घेतली.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वळवाच्या आणि वादळी पावसामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक झाडे धोकादायक बनली होती. ही झाडे धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती तत्काळ हटविण्याची आवश्यकता होती. याबाबत आयुक्त कापडणीस यांनी धोकादायक झाडे काढण्याबाबत उद्यान विभागाला आदेश दिले होते. यानुसार सांगलीच्या उर्दू हायस्कूलच्या बाहेर भिंतीवर पडलेले झाड हटविण्याचे काम उद्यान विभागाने सुरू केले आहे. उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हे धोकादायक झाड काढण्यात आले. मिरजेत दोन ठिकाणी धोकादायक झाडे आहेत. तीही येत्या दोन दिवसांत हटविण्यात येतील, असे पाठक यांनी सांगितले.