अमोल कुदळे
दुधगाव : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणाऱ्या दुधगाव-खोचीदरम्यानच्या पुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न दुधगाव परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे. दीड वर्षात पूर्ण करावयाचा पूल साडेपाच वर्षे झाली, तरी पूर्ण झालेला नाही.
पन्नास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पुलाचे काम सुरू झाले. सुरुवातीस ठेकेदाराने जलदगतीने काम सुरू केले, परंतु बांधकाम विभागाने पुलाला जोडणाऱ्या रस्त्याची जागा भूसंपादन केली नसल्यामुळे काम तीन वर्षे रखडले. नंतर कोरोनामुळे काम बंद पडले. सध्या काम संथगतीने सुरू आहे.
या पुलामुळे पेटवडगाव येथून सांगलीला जाण्याचा मार्ग जवळ होणार आहे.
पुलाच्या ठिकाणी सध्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. तो अरुंद व कमी उंचीचा असल्यामुळे वाहतुकीस धोकादायक आहे. पुलाच्या कामासाठी तीनवेळा निविदा काढण्यात आली. त्यानंतर तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांनी पुलासाठी निधी वाढवून घेतला. प्रथम पाच कोटी असलेला निधी सात कोटी करून घेतला. अखेर नोव्हेंबर २०१५ मध्ये कामाला सुरुवात झाली.
या पुलासाठी सहा कोटी ९७ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. १५ एप्रिल २०१७ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती. पुलाचा ठेका पुणे येथील ठेकेदाराने घेतला आहे. ठेकेदाराने २०१५ मध्ये सहा कॉलम व तीन गाळे स्लॅबसह पूर्ण केले होते. मात्र पुलाला जोडणारा रस्ता शेतातून जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. भूसंपादनाच्या मध्यस्थीने तोडगा काढून पुन्हा काम सुरू करण्यात आले. मेमध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे पुन्हा काम थांबविण्यात आले. डिसेंबरमध्ये एक कॉलम व एका गाळ्यातील स्लॅब पूर्ण करण्यासाठी कामगार आले, पण गेली चार महिने हे काम पूर्ण झालेले नाही.