खानापूर : खानापूर घाटमाथ्यावर सुरू असलेले गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे प्रवासीवर्ग व वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी गुहागर - विजापूर या राज्यमार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करण्यात आले. तेव्हापासून या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. विटा ते ताडाचीवाडीपर्यंत असणाऱ्या खानापूर तालुक्याच्या हद्दीतील काम फारच संथ गतीने सुरू आहे.
एका वेळी अनेक ठिकाणी रस्त्याची उकराउकरी करून दुरावस्था केली आहे. रस्त्याचे काम पट्टा पद्धतीने सुरू आहे. रेवणगाव, खानापूर, सुलतानगादे, हिवरे, पळशी, जरंडी पत्रा येथील रस्ते गेल्या वर्षापासून उकरून ठेवले आहेत. यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
या उकरलेल्या खराब रस्त्यांचे येत्या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.