लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : चांदोली अभयारण्यातील उखळू धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याला दिशादर्शकांचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पर्यटकांना आता हा धबधबा पाहण्यासाठी सोयीचा व सोपा मार्ग झाला आहे.
या धबधब्याकडे पर्यटक छोटी सहल म्हणून येत असतात. पर्यटकांना अवघड रस्त्याने धबधब्याकडे जावे लागत आहे. परंतु याच परिसरात सर्वांना जाता येईल अशी सोपी वाट आहे. मात्र या वाटेवर कोणताच दिशादर्शक फलक अथवा मार्किंग नसल्यामुळे त्रास सोसत अवघड वाटेने जावे लागत आहे. अवघड वाटेवर झाडांची सावली नसल्यामुळे उन्हाचा त्रास सहन करत जावे लागते.
प्लॅनेट अर्थ फाउंडेशन आणि बारबेट हाऊस ऑफ चांदोलीमार्फत योग्य वाटेवरून झाडांवर आणि दगडांवर पांढऱ्या रंगाने मार्किंग करण्यात आली आहे. यामुळे सर्व वयोगटातील नागरिक या वाटेने निसर्गाचा आनंद घेत धबधब्यापर्यंत सुखरूप जाऊ शकतील. या वाटेवरून जाताना नागरिकांना ट्रेकिंग केल्याचा अनुभव मिळेल. ही वाट झाडातून गेल्यामुळे सावली मिळेल आणि गरज वाटल्यास विश्रांतीसुद्धा घेता येईल. पर्यटकांनी धबधब्याकडे जाताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये तसेच पायामध्ये बूट घालणे आवश्यक आहे. या वाटेवर पांढऱ्या रंगाचे मार्किंग करत असताना प्लॅनेट अर्थ फाउंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव महाजन, सदस्य वैभव नायकवडी, गणेश पाटील उपस्थित होते.