फोटो ओळ : वारणा नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मांगले-काखे दरम्यानच्या पुलाचे काम ठप्प झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : सातारा-सांगली-कोल्हापूर जिल्हे जोडणाऱ्या वारणा नदीवरील मांगले-काखे दरम्यानच्या नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, सध्या अवघ्या एका पीलरच्या उभारणीचे काम नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहामुळे ठप्प आहे. फक्त चार ते पाच दिवस नदीतील पाणी कमी केल्यास पिलरचे काम पूर्ण होईल, अन्यथा आणखी वर्षभर पुलाचे काम रखडेल, अशी आवस्था आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी करण्याची मागणी होत आहे.
वारणा नदीवरील मांगले-काखे पुलाची उंची खूप कमी होती. त्यामुळे पावसाळ्यात हा पूल सातत्याने पाण्याखाली जात होत होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क तुटत होता. गेल्या पंचवीस वर्षांपासून या पुलाची उंची वाढविण्याची मागणी मांगले परिसरातील नागरिकांनी केली होती. याची दखल घेत, माजी मंत्री व आमदार शिवाजीराव नाईक विशेष प्रयत्न करून केंद्रीय रस्ते मार्ग योजनेतून हा पूल मंजूर करून घेतला आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून पुलाच्या उभारणीचे काम गतीने सुरू झाले. सात महिन्यांत आठपैकी सात पीलरचे व पाच गाळ्यांचे काम मार्गी लागले आहे. आता फक्त एक पीलर व दोन गाळ्यांचे काम वारणा नदीपात्रातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे होऊ शकलेले नाही. त्यामुळे पुलाचे काम सध्या पूर्णपणे ठप्प आहे. पाटबंधारे विभागाने तत्काळ चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी फ़क्त चार ते पाच दिवस बंद करावे. या पाण्यामुळे रखडलेल्या पीलरच्या उभारणीचे काम मार्गी लागेल.