लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यंत अडीच कोटी रुपये खर्चाच्या ट्रिमिक्स काँक्रीट व हॉटमिक्स रस्त्याच्या कामास दोन महिन्यांनंतर सोमवारी प्रारंभ झाला. रस्त्याचे काम रखडल्याने आयुक्तांनी महापालिका अधिकारी व ठेकेदारास दैनंदिन दंड आकारणीचे आदेश दिल्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारीचे काम अर्धवट आहे. रस्त्याच्या बाजूस झाडे व खोक्याच्या अतिक्रमणामुळे रस्तेकामास अडथळा निर्माण झाला आहे. रस्ता करताना खोकी हटविण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. यामुळे अडीच कोटी रुपये खर्चूनही रस्ता अरुंदच राहणार आहे. अधिकाऱ्यांना व ठेकेदारास प्रतिदिन दंड आकारण्याच्या आयुक्तांच्या आदेशानंतर ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र, रस्त्याच्या कामात येणाऱ्या अतिक्रमणाचा प्रश्न कायम आहे. रेल्वेस्थानक ते बसस्थानक चाैकापर्यंत पूर्ण रुंदीने हा रस्ता झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून वाहतुकीचा अडथळाही दूर होणार आहे. मात्र, अतिक्रमणे न काढता रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या घाईमुळे रस्त्याचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.