मिरज : मिरजेत खंदक परिसरात भाजीमंडईचे रखडलेले काम सुरू करण्याबाबत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी खंदकाच्या जागेची पाहणी केली. भाजीमंडईचे काम १ एप्रिलपूर्वी सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
खंदकातील जागेची कायदेशीर मोजणी, सीमांकन व मालकी हक्काबाबतचे वाद यामुळे हे काम सुरू होऊन वर्षभर थांबले आहे. काम सुरू करण्याबाबत तांत्रिक व कायदेशीर अडचणी दूर करून महापालिकेच्या मालकीच्या क्षेत्राचा सुधारित बांधकाम परवानगी नकाशा मंजूर करण्यात आला आहे. भाजीमंडईचे काम १ एप्रिलपूर्वी सुरू होण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. भाजीमंडईसाठी खंदक परिसरातील जागेची साफसफाई करण्याच्या सूचनाही आयुक्त कापडणीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. गेली अनेक वर्षे मिरजेच्या भाजीमंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. आयुक्त कापडणीस यांनी याबाबत पाठपुरावा करून जागेबाबतच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. खंदक परिसरातील जागेवर १३ कोटी खर्चाचे भाजीमंडईचे काम लवकरच सुरू होणार असून, मिरजकर नागरिकांसाठी सुसज्ज मंडई उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.