सांगली : पोलीस ठाण्यांचे काम लवकरच आॅनलाईन सुरू केले जाईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी किरकोळ गुन्ह्यांत वाढ झाली आहे, अशी कबुलीही वर्मा यांनी दिली. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी करण्यासाठी वर्मा गेल्या पाच दिवसांपासून सांगली दौऱ्यावर आहेत. सोमवारी परेड, पोलीस दरबार झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ठाण्यांची वार्षिक तपासणी आज पूर्ण झाली आहे. सांगली पोलिसांची कामगिरी समाधानकारक आहे. शंभरहून पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधून थेट त्यांच्या मुलाखती घेतल्या. प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतला. न्यायालयाचे समन्स, वॉरंट व लोकांचे प्रलंबित तक्रार अर्ज हे तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचाही आढावा घेतला आहे. पोलीस परेड उत्तम दर्जाची झाली. ते म्हणाले, प्रलंबित गुन्ह्यांचा येत्या दीड महिन्यात निपटारा करण्याची सूचना केली आहे. सातारापाठोपाठ सांगली पोलिसांचे काम चांगले आहे. बँक ग्राहक व महिलांना लुटणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शस्त्रधारी पोलिसांची गस्त सुरू केली आहे. पोलीसमित्र ही संकल्पना लवकरच अंमलात आणली जाईल. सांगली, मिरजेतील बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला जाईल. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचा गौरव ---उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा वर्मा यांनी गौरव केला. यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, जिल्हा विशेष शाखेचे बाळकृष्ण कदम, सदाशिव शेलार (आटपाडी), मोहन जाधव (विटा), सहायक निरीक्षक शंकर पांचाळ (पलूस), अजित जाधव, संगीता माने, (मिरज शहर), जयश्री पाटील, संगीता पाटील (इस्लामपूर), उत्तम घारगे (जिल्हा विशेष शाखा), पी. एस. भोपळे (चिंचणी-वांगी), उपनिरीक्षक बाजीराव मोहिते, रफिक शेख, इसाक चौगुले (आटपाडी), शिल्पा दुथडे (मिरज शहर), मनोज कांबळे, राजाराम निकम, युवराज कामटे (सांगली शहर) व जहाँगीर शेख (इस्लामपूर) यांचा समावेश आहे.
पोलीस ठाण्यांचे काम लवकरच आॅनलाईन
By admin | Published: November 09, 2015 10:46 PM