लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : शासनाने एन. ओ. टी.मधून कर्ज काढून सुरू केलेल्या महाबळेश्वर ते विटा या राज्य महामार्गाच्या सातारा-रहिमतपूरमार्गे विटा या अंतरातील काम अत्यंत निकृष्ठ झाले आहे. या राज्य महामार्गाचे थर्ड पार्टी ऑडिट करून ठेकेदाराची चौकशी करावी व त्याच्याकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते व आनंदराव पवार यांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
शासनाने महाबळेश्वर ते विटा राज्य महामार्गाच्या कामासाठी कर्ज काढून निधी उपलब्ध केला आहे. परंतु, या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने इस्टिमेटप्रमाणे काम केलेले नाही. हे काम अत्यंत बोगस पध्दतीने केले आहे. या कामामध्ये जी. एस. बी., त्यावर होणारे बी. एम. आणि सेव्हिडन्स हे इस्टिमेटप्रमाणे त्याचे थिकनेस झालेले नाही. याची शासनाच्या नियमाप्रमाणे ब्लॉक काढून पुणे येथील प्रयोगशाळेत त्याची चाचणी करावी व थर्ड पार्टी ऑडिट करणे गरजेचे आहे.
संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी संजय विभुते व आनंदराव पवार यांनी केली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.