लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळा तालुक्यातील पुनवत, सागाव परिसरात वारणा डावा कालव्याच्या कामांना प्रदीर्घ काळानंतर सुरुवात झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कालव्यात पाणी खळाळणार असे चित्र निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना गळती व नापिकीची धास्ती वाटू लागली आहे.
शिराळा तालुक्यात वारणा डावा कालव्याचे रिळे जलसेतूपर्यंतचे काम याअगोदरच पूर्ण झाले आहे. चांदोली धरणापासून हा सुमारे ३८ किलोमीटरपर्यंतचा टप्पा आहे. या टप्प्यात कालव्यातील अस्तरीकरणाचे काम झाले आहे. परंतु, या टप्प्यात अनेक उणिवा राहिलेल्या आहेत. कालव्याची गळती ही प्रमुख समस्या आहे.
सध्या ३८ किलोमीटरपासून ते ७० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात ठिकठिकाणी कामांना सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी कालव्यातील साफसफाई करून अस्तरीकरणाच्या हालचाली सुरू आहेत. पोटकालव्यातून शेतीला पाणी देण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
पुनवत, सागाव परिसरात सुमारे दहा वर्षांपूर्वी कालव्यात जागोजागी अस्तरीकरण करण्यात आले आहे. त्याची सध्या बिकट अवस्था आहे. अनेक ठिकाणी ते उद्ध्वस्त झाले आहे. कालव्यात झाडेझुडपे उगवली आहेत. कोणतीही देखभाल दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
आता नव्याने कामांना सुरुवात झाल्याने नजीकच्या काळात रिळे जलसेतूपासून पुढे कालव्याला पाणी येणार हे निश्चित आहे. जर पुढील टप्प्यातही कालव्याच्या गळतीची समस्या उद्भवली तर या परिसरातीलही शेकडो एकर जमिनीला फटका बसणार आहे.