मिरज : मिरज तालुक्यातील ढवळी-जुनी धामणी रस्त्यावर रस्त्याचे काम करताना डंपरच्या धडकेत मल्लू सब्बू राठोड (वय ३५, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) या कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत डंपरचालक महंतेश जमगोंडा (३०, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता ढवळी-जुनी धामणी रस्त्यावर काम सुरू असताना तेथे मल्लू राठोड, प्रशांत काटकर व अन्य कामगार खडी पसरत होते. रस्त्याच्या कामासाठी एक डंपर खडी घेऊन आला होता. खडी घेऊन भरधाव आलेल्या डंपरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो खडीवरून घसरुन प्रथम त्याने राठोड यांना व रस्त्यावर थांबलेल्या रोडरोलरला ठोकरले. अपघातातील गंभीर जखमी राठोड यांना सांगली सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रशांत काटकर यांनी चालकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.