सांगली : गावांचा विकास करताना आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत सुटलो आहोत. हे पुढे असेच चालू राहिले, तर श्वास घेण्यासाठी हवा चांगली नसेल, पिण्याच्या पाण्यावर लष्कर तैनात करावे लागेल. स्मार्ट गावामध्ये मूलभूत सुविधा देताना, निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी कारभाऱ्यांनो, भविष्याचा वेध घेऊन गावांचा विकास करा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांनी केले. सांगलीतील भावे नाट्य मंदिरात शुक्रवारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे ‘आदर्श ग्रामपंचायत’, ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी स्नेहल पाटील होत्या. डॉ. देशमुख म्हणाले की, ज्या गावाची गावकी आणि भावकी व्यवस्थित असते, ते गाव चांगले असते. गावाची जीवनमूल्ये तितक्याच ताकदीने विकसित होणे गरजेचे आहे. फक्त भौतिक सुविधा महत्त्वाच्या नाहीत. जीवनमूल्ये, कायदा सुव्यवस्थाही चांगली हवी. गावांचा विकास करताना, संवेदना नसल्या तरी, किमान पुढच्या पिढीला जगण्यासाठी काही शिल्लक राहील, असे गाव, असा समाज आपण तयार करणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढीसाठी जगण्याच्या लायकीचे काम आपल्याला निर्माण करायचे आहे. त्याबाबतची जबाबदारी गावाच्या कारभाऱ्यांसोबत प्रत्येक ग्रामस्थांची असल्याची जाणीव हवी.स्नेहल पाटील म्हणाल्या की, गावासाठी पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी योगदान दिल्यास गावाचा चेहरा बदलणे अशक्य नाही, हे या पुरस्कारप्राप्त गावांनी दाखवून दिले. या ग्रामपंचायतीचा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायती घेतील, अशी अपेक्षा आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष योगदान द्यावे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे.उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी, आदर्श ग्रामपंचायतींनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. रणधीर नाईक यांनी, निधीचे नियोजन केल्यास गाव आदर्श बनविण्यात अडचण नसल्याचे स्पष्ट केले. छायाताई खरमाटे म्हणाल्या, ज्या गावांत मुलींचा जन्मदर वाढला आहे, त्यांचा जिल्हा परिषदेने गौरव केला पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, यमाजी पाटलाचीवाडी या गावात २००३ पासून शोषखड्डे वापरले जातात. गावात गटारी नाहीत. त्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली दिसते. डासांचे प्रमाणही नगण्य आहे. या गावाचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, जि. प. सदस्य भीमराव माने, रणधीर नाईक, तानाजी यमगर, प्रकाश कांबळे, शरद लाड, काकासाहेब धामणे, संयोगिता कोळी, छायाताई खरमाटे, संपतराव पवार, माजी सदस्या छायाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. कवठेपिरान, कामेरी आणि भाटवाडी या तीन ग्रामपंचायतींना संयुक्तपणे यावेळी जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला. (प्रतिनिधी)
कारभाऱ्यांनो, भविष्याचा वेध घेऊन विकास करा
By admin | Published: March 17, 2017 11:38 PM