सांगली : सांगलीतील बालस्केटिंगपटू सई पेटकरने रविवारी सलग एक तास लावणी स्केटिंगचा नवा विश्वविक्रम नोंदविला. वंडर बुक, जिनिअस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड अशा चार पुस्तकांमध्ये तिच्या या विक्रमाची नोंद केली जाणार आहे.सांगलीच्या कल्पद्रुम क्रीडांगणावर सायंकाळी सहा वाजता या विश्वविक्रमी उपक्रमास सुरुवात झाली. यावेळी महापौर संगीता खोत, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई, गीता सुतार, आरबोळे स्केटिंग अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रा. शिवपुत्र आरबोळे, प्रशिक्षक शैलेश पेटकर उपस्थित होते.महाराष्टÑीयन नृत्यकलेला खेळाची जोड देत अनोख्या संगमातून एक नवा स्केटिंग प्रकार या माध्यमातून समोर आला आहे. स्केटिंगवर नृत्य सादर करण्याचे प्रकार यापूर्वी झाले असले तरी, लावणीच्या ठेक्यावर तासभर स्केटिंगचा हा उपक्रम नवीन असल्याने, सांगलीकर रसिक, क्रीडाप्रेमी, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची गर्दी झाली होती. प्रत्येक नृत्यप्रकारावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. एकूण अकरा लावण्यांचा समावेश या उपक्रमात होता. न थांबता सई लावणीच्या तालावर स्केटिंगद्वारे नृत्य सादर करीत होती. ‘मला लागली कुणाची उचकी’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘मला जाऊ द्या ना घरी’, ‘दिसला गं बाई दिसला’ अशा एकापेक्षा एक बहारदार लावण्यांवर स्केटिंगसह थिरकणाऱ्या सईने उपस्थितांची मने जिंकली. एक तासानंतर तिची पावले थांबल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सांगली ही क्रीडापंढरी म्हणूनही नावारुपास आली आहे. अन्य क्रीडाप्रकारांबरोबरच गेली अनेक वर्षे सांगलीच्या स्केटिंगच्या क्षेत्रात अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. त्यात सई पेटकरने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. ती वसंत प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत आहे. तिचा हा विश्वविक्रम नोंदविण्यासाठी वंडर बुक, जिनिअस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड या चार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.सहा महिन्यांपासून सरावन थांबता तासभर लावण्यांवर स्केटिंगसह नृत्य सादर करणे हे कठीण काम आहे. त्यामुळे या प्रकारात सराव महत्त्वाचा होता. सईने यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून दोन तास सराव केला. या सरावामुळे तिला हा विक्रम करणे साध्य झाले.
सांगलीत लावणी स्केटिंगचा विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:22 AM