विटा : गेल्या दीड ते दोन वर्षापासून लोकसभा लढवण्यासाठी जोर बैठका मारत असलेले भाळवणी (ता. खानापूर) येथील डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीची बातमी रविवारी पसरली. मात्र चंद्रहार पाटील यांनी ती फेटाळली. सायंकाळी स्वत: आंबेडकर यांनीही पत्रकार बैठकीत त्याचा इन्कार केला. यामुळे वंचितच्या सांगलीच्या उमेदवारीचा गोंधळ आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा आहे.सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीने सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मला पाठिंबा दिला असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.लाल मातीच्या कुस्ती आखाड्यात ६५ चांदीच्या गदांचे मानकरी असलेले व महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे चंद्रहार पाटील सांगली लोकसभेचा शड्डू ठोकत आहेत. मात्र कोणत्या पक्षातून लढणार याबाबत निर्णय झाला नव्हता. उमेदवारीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांसह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याही संपर्कात होते.गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकाश आंबेडकर यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा केल्याचे वृत्त होते. रविवारी दुपारी सांगली लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, सायंकाळी त्याचा इन्कार केल्याने संभ्रम वाढला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 5:44 PM