बोरगाव : महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सिव्हिल पदविकेच्या (डिप्लोमा) दुसऱ्या वर्षातील चौथ्या सत्रातील ‘बिल्डिंग प्लॅनिंग अॅण्ड ड्रॉर्इंग’ या शेवटच्या परीक्षा पेपरमध्ये दोन प्रश्न चुकल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल २४ गुणांचे नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत बोर्डाने न्याय न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.सोमवारी अभियांत्रिकी सिव्हिल द्वितीय वर्षाच्या चौथ्या सत्रातील ‘बिल्डिंग प्लॅनिंग अॅण्ड ड्रॉर्इंग’ या विषयाचा पेपर दुपारी दोन ते सहा या वेळेत होता. इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात असलेल्या केंद्रात दोन वाजता विद्यार्थांना प्रश्नपत्रिका वाटप केल्या. यावेळी प्रश्न क्रमांक तीन व सहाचे प्रत्येकी बारा गुणांचे दोन प्रश्न चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या लक्षात आणून दिले. यानंतर परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ निर्माण झाला. यावरून कॉलेज प्रशासनाचाही संभ्रम झाला. यानंतर तात्काळ महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्याशी संपर्क साधला असता, ते दोन्ही प्रश्न चुकीचे असल्याचे कबूल करून, चुकीचे दोन प्रश्न सोडून व त्यांचे प्रश्न क्रमांक लिहून जागा सोडून बाकीच्या प्रश्नांचीउत्तरे लिहिण्यास सांगितले. मात्र असे चुकीचे प्रश्न आले आहेत, एकूण सत्तर गुणांच्या या पेपरमधील चोवीस गुण कमी झाले, तर ४६ गुणांचा पेपर राहतो. त्यात २८ गुण मिळाले नाहीत, तर त्या एका विषयात तो विद्यार्थी नापास होणार आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल पालक करत आहेत.या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक तीनमध्ये ‘फिगर नंबर वन - शो लाइन प्लॅन आॅफ रेसीडेन्सीयल बिल्डिंग’ असे दिले आहे, मात्र तिथे ‘फिगर नंबर वन’ दिलेली नाही. म्हणजे थोडक्यात फिगर नाही, तर प्रश्न सोडवायचाच कसा? सहाव्या प्रश्नातही फिगर नाही. या प्रश्नातही तोच गोंधळ असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. याला सर्वस्वी बोर्ड जबाबदार असून परीक्षा पुन्हा घेण्यापेक्षा ते २४ गुण विद्यार्थ्यांना द्यावेत, अन्यथा न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पालकांनी दिला आहे. लवकरात लवकर बोर्डाने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपरमधील प्रश्न चुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:03 AM