सांगली : गैरसोयी व गैरनियोजनामुळे सध्या चर्चेत असलेल्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील दोन्ही एक्स-रे मशिन्स बुधवारी बंद पडल्याने रुग्णांचे हाल झाले. रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी प्रयोगशाळेत यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
फायर ऑडिट न झाल्यामुळे सांगलीच्या शासकीय रुग्णालयावर सध्या टीका होत आहे. येथील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बऱ्याचदा रुग्णांना बाहेरची औषधे लिहून देण्यावरुनही तक्रारी होतात. अनेक चाचण्या सिव्हीलमध्ये होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी प्रयोगशाळेतून चाचण्या कराव्या लागत आहेत. अशातच बुधवारी एक्स-रे मशिन्स बंद पडल्याने रुग्णांचे हाल झाले.
एकाचवेळी दोन्ही यंत्रे बंद पडल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक रुग्णांना एक्स-रेसाठी बराच वेळ ताटकळत बसावे लागले. या मशिन्सची तातडीने दुरुस्ती हाेणे शक्य नसल्याने रुग्णांना बाहेरच्या प्रयोगशाळेचा रस्ता दाखविण्यात आला. मोफत औषधोपचारांसाठी शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्यांची धावाधाव झाली. शासकीय रुग्णालयाच्या या कारभारावर अनेकांनी नाराजी व संताप व्यक्त केला.
चौकट
शाळकरी मुलावर उपचाराला विलंब
खेळताना पडल्याने जखमी झालेल्या एका शाळकरी मुलाला तातडीने उपचाराची गरज होती. त्यामुळे बुधवारी सायंकाळी त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. एक्स-रे मशीन बंद पडल्याचे समजल्यानंतर खासगी प्रयोगशाळेत या मुलाच्या पालकांना पाठविण्यात आले. त्याठिकाणीही गर्दी होती. त्यामुळे त्या मुलावरील उपचारांना विलंब झाला.
चौकट
रुग्णालयाकडून प्रतिसाद नाही
एक्स-रे मशिन्सबाबतची वस्तुस्थिती व रुग्णालयाचे याबाबतचे म्हणणे जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही.