सांगली : मटका किंग यल्लाप्पा दोडमणी टोळीने आज (गुरुवार) येथील शासकीय रुग्णालयात धुडगूस घालत रुग्णालयातील दरवाजा तोडून खिडक्यांच्या काचाही फोडल्या. सिव्हिलमधल्या सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की केली. तत्पूर्वी किरकोळ कारणावरून कौसर मैंदर्गी, त्यांचे पती असीफ व मुलगा निहाल यांंना बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी, तर विश्रामबाग पोलीस ठाण्यात यल्लाप्पा दोडमणीसह त्याच्या टोळीतील सुमारे ५० जणांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, कौसर मैंदर्गी (वय ३७, रा. पारिजात कॉलनी, सांगली) यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे त्या आपल्या पतीसह इंद्रप्रस्थ (माधवनगर रस्ता) येथील डॉ. उमेश जोशी यांच्या रुग्णालयात दुपारी दोनच्या सुमारास गेल्या होत्या. रुग्णालयात गर्दी असल्यामुळे त्यांनी शेजारीच असलेल्या यल्लाप्पा दोडमणीच्या घरासमोर कार लावली. यावेळी असीफ व त्यांचा मुलगा निहाल हे गाडीतच झोपले होते. त्यावेळी दोडमणी त्याठिकाणी आला व त्याने शिवीगाळ करुन, गाडी दरवाजासमोरुन काढण्यास सांगितले. निहाल हा कारपुढे लावलेली आपली दुचाकी (क्र. एमएच ०९, एआर. ७०३९) काढून घेण्यासाठी कारमधून उतरत असतानाच दोडमणी याने, ‘समजत नाही का?’ म्हणून पुन्हा शिवीगाळ केली. त्यानंतर वाहनात बसलेल्या कौसर यांनी, ‘शिवीगाळ का करता?’ अशी दोडमणीकडे विचारणा केली असता, त्याने कौसर यांचा दुपट्टा ओढला. त्यानंतर कौसर यांनी दोडमणी याच्या कानशिलात मारल्यानंतर दोडमणी याच्या दोन मुली व पत्नीने कौसर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामधून स्वत:ची सुटका करून घेत मैंदर्गी कुटुंबीय शहर पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर दोडमणी याचेही कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. दोघांनाही पोलिसांनी तासाच्या अंतराने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविले. मैंदर्गी कुटुंबियांवर उपचार सुरू असतानाच, दोडमणी टोळीतील सुमारे चाळीसजण त्या ठिकाणी आले. त्यांनी ओपीडीचा बंद दरवाजा मोडून मैंदर्गी कुटुंबियांना मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की करण्यात आली. मैंदर्गी कुटुंबियांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. यावेळी दोडमणीच्या साथीदारांनीही विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात मात्र परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, याच्या सखोल चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.(प्रतिनिधी)गाड्या फोडल्या...दोडमणीच्या टोळीने मैंदर्गी कुटुंबाचा शोध घेत सिव्हिलमध्ये धुडगूस घातला. तत्पूर्वी निहाल मैंदर्गी याने दोडमणी याच्या घरासमोर लावलेली दुचाकी (क्र. एमएच एआर. ७०३९) दगड घालून फोडली. कारचीही मोडतोड केली. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारातही दोडमणी टोळीच्या लोकांनी गर्दी केली होती. मैंदर्गी कुटुंबाला पोलिसांच्या संरक्षणात ठेवण्यात आले होते.
यल्लाप्पा दोडमणी टोळीचा ‘सिव्हिल’मध्ये धुडगूस
By admin | Published: November 06, 2014 10:37 PM