जत : जत येथील यल्लमादेवीची यात्रा कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव यांच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. ७ ते १४ जानेवारी २०२१ अखेर मंदिरापासून दोन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देवीचे धार्मिक विधी नित्यनेमाने होणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी यात्रा समितीने आयोजित केलेल्या बैठकीत दिली.
यावेळी आमदार विक्रम सावंत, तहसीलदार सचिन पाटील, जत नगरपालिका नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, संस्थानिक श्रीमंत शार्दुलराजे डफळे, बाबासाहेब कोडग, सोमनिंग चौधरी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रथा व परंपरेनुसार ७ ते १४ जानेवारी २०२१ अखेर यात्रा भरवण्यात येणार होती, परंतु कोरोना संसर्ग व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून समितीने यात्रा रद्द केली आहे. यात्रेसाठी कर्नाटक व आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मंदिर परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. एकाच वेळी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत याची दक्षता प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे. यात्रा समितीने देवीचे धार्मिक विधी मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत पूर्ण करावेत. जत शहरातून दरवर्षी निघणारी पालखी मिरवणूक काढू नये, श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार समितीच्या वतीने भरविण्यात येणारा जनावराचा बाजार भरवण्यात येऊ नये, अशी सूचनाही प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी यावेळी केली.