भिलवडी : पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी (भिलवडी) येथील यशवंत गजानन गुरव याने कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावला. केवळ तीन वर्षांच्या मेहनतीचे हे फळ असून उणिवा शोधून भविष्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकायचे ध्येय असल्याचा निर्धार यशवंतने व्यक्त केला.नूर सुलतान (कझाकिस्तान) येथे १४ ॲागस्टला झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलाॅनचे आव्हान केवळ १३ तास ३३ मिनिटांत पूर्ण करून १८ ते २४ वयोगटात तिसरा क्रमांक पटकाविल्याने त्याला आयर्नमॅन किताब देऊन गौरवण्यात आले.या स्पर्धेत सलग ३.८ किलोमीटर खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी १६०० स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहत असलेल्या वाऱ्याविरुद्ध सायकलिंग करणे व लगोलग ४२.२ किलोमीटर धावणे ही आव्हाने सलग पूर्ण करावी लागतात. हे आव्हान १६ तासांच्या आत पूर्ण करणाऱ्यास आयर्नमॅन हा किताब बहाल केला जातो. यशवंतने हे आव्हान १३ तास ३३ मिनिटांत पूर्ण केले.भारतातून या स्पर्धेत १८० खेळाडू सहभागी झाले. यशवंतला सातारा हिल मॅरेथॉन, सांगली, इचलकरंजी मॅरेथॉन, कागल ट्रायथलॉन, कोल्हापूर बर्गमॅन या स्पर्धेतील अनुभव उपयोगी ठरला. कृष्णा नदीपात्रात मगरीच्या भीतीमुळे पोहणे थांबले होते, मात्र सांगलीच्या क्रीडा संकुलातील जलतरण तलावात त्याने पोहण्याचा सराव केला. सांगली, मिरज, पंढरपूर तसेच सांगली कोल्हापूर रोडवरून धावणे व सायकलिंगचा नियमित सराव सुरू आहे.
वडील पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव, आई प्राथमिक शिक्षिका सुवर्णा गुरव, अर्हता क्लब कोल्हापूरचे पंकज रवाळू, आशिष रवाळू यांचे मार्गदर्शन लाभले. सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयातून त्याने बी.एस्सी. पूर्ण केले असून भविष्यात भारतीय सैन्यदलात जाण्याचा त्याचा मानस आहे.
सरावातील सातत्याने विसरली वेदना‘बाबा, तुमच्या बरोबरीने सायकल चालविली की माझे पाय दुखतात’, असे तीन वर्षांपूर्वी यशवंतने वडिलांना सांगितले होते. त्यावेळी त्यांनी, ‘तू सकारात्मक राहून सराव केलास की, सर्व वेदनांचा विसर पडेल’, असा सल्ला दिला होता. सातत्याने सराव करीत राहिलो. बाबांच्या आधारामुळे किताब जिंकला, अशी भावना यशवंत गुरवने व्यक्त केली