अतुल जाधवदेवराष्टे : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाचा प्रश्न निधी असूनही प्रलंबित पडला आहे शासनाची उदासीनता. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे तब्बल गेल्या दहा वर्षांपासून दोन कोटी १७ लाख रुपयांचा निधी पडून होता. तो ही आता गायब झाला आहे. जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारकांना थेट वारस असल्यामुळे त्यांची स्मारके नवीन दमाने व नव्या जोमाने उभा राहिली. मात्र चव्हाणसाहेबांना थेट वारस नसल्यामुळे त्याच्या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा संतप्त सवाल यशवंतप्रेमींतून व्यक्त होत आहे.संयुक्त महाराष्ट्राचा कलश उभारून आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती करणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराची कहाणी अतिशय वादग्रस्त ठरली आहे. गेल्या २५ वर्षांपासून या जन्मघराचे स्मारक करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. पण लोकप्रतिनिधींचे प्रामाणिकपणे होत असलेले दुर्लक्ष व प्रशासनाला नसलेले गांभीर्य यामुळे गेल्या २५-३० वर्षांपासून चव्हाणसाहेबांचा स्मारकाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
दहा वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुरातन विभाग हे जन्मघराची देखभाल दुरुस्ती पाहत आहेत. आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
मंजूर निधी गेला कुठे?
डॉ. पतंगराव कदम यांनी जन्मशताब्दीनिमित्त स्मारकासाठी तब्बल दोन कोटी १७ लाखांचा निधी मंजूर केला. मात्र, दहा वर्षांपासून जिल्हा नियोजन मंडळाकडे स्मारकाचा निधी पडून होता. तो आता गायब झाला आहे त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.