विटा : नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत साखर कारखाना या हंगामात ऊसाला प्रतिटन २७५० रुपये दर देणार असल्याची घोषणा खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी कारखाना कार्यस्थळावर पत्रकार परिषदेत केली. तोटा सहन करावा लागला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या कष्टाचा व घामाचा सन्मान करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार पाटील म्हणाले, परिसरात सध्या ताकारी, टेंभू योजनेचे पाणी आले आहे. शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देत आहेत. कोरोनामुळे ऊसतोड कामगारांची वानवा आहे. ही यंत्रणाही फार कमी आहे. त्यामुळे कारखान्यासह शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ लागले आहे. अशा परिस्थितीत चांगला भाव व वेळेत पैसे मिळावेत, यासाठी प्रयत्नशील आहे. कारखाना उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देणार आहे. यंदाच्या हंगामातऊसाला प्रतिटन २७५० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, शंकर मोहिते उपस्थित होते.