सांगली : राजकीय पक्ष, नेत्यांच्या जनआशिर्वाद यात्रा, मेळावे, सभा सुरू आहेत. गणेशोत्सवावर मात्र निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण सांगितले जात आहे. सरकारने असा दुटप्पीपणा बंद करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली आहे.
सावंत म्हणाले, ठाकरे सरकार कोरोनाचे भांडवल करत आहे. सोयीस्कर निर्णय घेतले जात आहेत. मुख्यमंत्री ठाकरे कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करतात, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते, आमदार मेळावे, रॅली काढत आहेत. अन्य पक्षांचे मेळावे, आंदोलने, आशीर्वाद यात्रा सुरू आहेत. यावर निर्बंध घातले जात नाहीत. केवळ जुजबी गुन्हे दाखल केले जात आहेत. तर दुसरीकडे सण, उत्सवावर मात्र निर्बंध आहेत.
आधी दहीहंडीवर निर्बंध घालण्यात आले. आता गणेशोत्सवावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू आहेत. हिंदूंनी सण, उत्सव साजरे करू नयेत अशी सरकारची इच्छा आहे का? सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. शासनाने गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध घालू नयेत. नागरिकांना हा उत्सव उत्साहात साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही सावंत यांनी केली.