सांगली : तंत्रज्ञानाच्या जोडीने निवडणुका अधिकाधिक स्मार्ट होत असल्याचा अनुभव या निवडणुकीत आला. यंदा मतदारांना स्लिपा देण्यासाठी बुथवरील तरुणांनी पोर्टेबल प्रिंटरचा सर्रास वापर केला. सांगलीत प्रथमच हा प्रयोग झाला.
निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे नेमके मतदान केंद्र सांगण्याची जबाबदारी लोकसभेला कार्यकर्त्यांनी पार पाडली होती. घरोघरी स्लिपाही पोहोचवल्या होत्या. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तंत्रज्ञानाचे एक पाऊल पुढे पडले. स्लिप देण्यासाठी थेट मोबाईल प्रिन्टरचा वापर झाला. प्रमुख उमेदवारांनी बुथवर ते दिले होते. एका बुथवर दोन, असे सांगलीत २९६ बुथसाठी किमान ५९२ प्रिन्टर उमेदवाराकडून पुरवले गेले. मतदाराचा निवडणूक ओळखपत्र क्रमांक टाकला, की संपूर्ण स्लिपची प्रिन्ट त्यातून निघते. त्यात मतदाराचे नाव, मतदारसंघ, मतदान केंद्र आदी तपशीलवार माहिती येते. प्रचार कालावधित कार्यकर्त्यांनी घरोघरी या प्रिन्टरच्या माध्यमातूनच स्लिपा पोहोच केल्या. अगदी एखादा मतदार रस्त्यात भेटला तरीही, त्याची स्लिप तेथेच प्रिन्ट करुन दिली. त्यावर उमेदवाराचे नाव, चिन्हदेखील होते. मात्र बुथवरील स्लिपांवर चिन्ह, नाव काढण्यात आले होते.
दीड हजार रुपये भाडेनिवडणुकीसाठी एका प्रिन्टरला दीड हजार रुपये भाडे द्यावे लागते. ब्लू टूथद्वारे ते मोबाईलला जोडले जाते. बॅटरी अणि कागदी रोल पुरवला की, कितीही स्लिपा काढता येतात. अशा प्रिन्टरच्या वापरामुळे यंदा छापील स्लिपा किंवा प्रचारपत्रकांचे प्रमाण कमी झाले.
सांगलीत विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान स्लिपा देण्यासाठी यंदा प्रथमच पोर्टेबल प्रिन्टरचा वापर झाला.