सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी १२ टक्क्यांनी शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.सांगलीतील नमराह कोरोना सेंटर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी ते म्हणाले, शहरासह ग्रामीण भागात आज अनेक कोरोना विलगीकरण कक्ष सुरू आहेत. त्या ठिकाणी रूग्णांच्या करमणुकीसाठी प्रयत्न करणार आहोत.
आज जे कलाकार काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत, त्यांनाही आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी युवा नेते डॉ. जितेश कदम, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले, जावेद नायकवडी, रहीम मुल्ला, इरशाद सोलापुरे, डाँ.रौफ मुल्ला, मुन्ना पटेकरी, छोटू ऐनापुरे आदी उपस्थित होते.मंत्री कदम पुढे म्हणाले, यंदाच्या वर्षी हवामान खात्याकडून वेळेत मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरिपाच्या बैठकी पार पडलेल्या आहेत. योग्य त्या सूचना सर्व पातळ्यांवर देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना लागेल, त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तर गेल्या वर्षी महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतीचे 12 टक्के उत्पन्न वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडून आधुनिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचबरोबर चांगला पाऊस यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात शेतीचा विक्रमी उत्पादन होईल, असा विश्वास विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.केंद्र सरकारवर दाबव आणला पाहिजेमराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आघाडी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत आणि भविष्यातही टाकली जातील. कायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर आहे. पण आंदोलन हा वेगळा विषय आहे. सर्वानी राज्य सरकार सोबत चर्चा चालू ठेवून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.