निवास पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील शब्बीर व रज्जाक मुलाणी या बंधूंनी ५० हजार रुपये खर्चून कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणारी औषधे प्राथमिक आरोग्य केद्रात उपलब्ध करून दिली आहेत. या दोन बंधूंच्या दानशूरपणामुळे माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या महामारीत रक्ताची नाती दूर होऊ लागली आहेत. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वजण हतबल होऊ लागले आहेत. शासकीय यंत्रणांचे प्रयत्नही अपुरे पडू लागलेत. गरिबांना औषधोपचार मिळणे मुश्किल होत आहे. रुग्णास लागणारा औषधसाठा कमी आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीने केले होते.
कोरोना दक्षता समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत शब्बीर व रज्जाक मुलाणी या बंधूंनी ५० हजार रुपये खर्चून रुग्णांसाठी लागणारी औषधे प्राथमिक आरोग्य केद्रात उपलब्ध करून दिली आहेत.
अल्प उत्पन्न असणाऱ्या या दोन बंधूंनी मिळालेल्या उत्पन्नातून ५० हजार रुपयाची औषधे प्राथमिक आरोग्य केद्राकडे सुपूर्द केली. यावेळी सरपंच गणेश हराळे, ग्रामविकास अधिकारी जयवंत थोरात, डॉ. जयंत सावंत, रमेश पाटील, शहाजी पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.