- श्रीनिवास नागे‘भाजपमध्ये पुन्हा जायला मला काय खुळ्या कुत्र्यानं चावलंय का?’ असा खासगीत सवाल करणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी वंचित बहुजन आघाडी सोडली... आणि आता ते पुन्हा भाजपवासी होताहेत. ‘भाजपनं आरक्षण दिलं नाही तर, भाजपकडून मी उभा राहिलो तरी मतदान करायचं नाही’, अशी शपथ आरेवाडीतल्या बिरोबाच्या बनात कार्यकर्त्यांना घ्यायला लावणारे गोपीशेठ (हो! आटपाडी-माणमध्ये त्यांना अजूनही शेठ म्हणतात.) आता आमदारकीचं बाशिंग बांधून भाजपच्या प्रचारात उतरणार. कसंही करून सत्तेत जाण्यासाठीचा दुसरा मार्ग त्यांना हुडकता आला नसावा बहुधा.
गोपीशेठ नेहमीच धनगर समाजाच्या आरक्षणाचं कार्ड वापरत आलेत. भाजपनं ते दिलं नसल्यानं वर्षभर सरकारवर तोंडसुख घेतलं. आता विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप सरकारनं आरक्षणाबाबत सकारात्मक पावलं उचलल्याचा आणि ते त्यांच्याकडूनच मिळणार असल्याचा साक्षात्कार त्यांना झालाय... म्हणूनच त्यांनी शपथ मोडली...सहा-सात वर्षांपूर्वी महादेव जानकरांच्या ‘रासप’ला सोडचिठ्ठी देऊन गोपीशेठ भाजपवासी झाले. मुंडे-तावडेंनी त्यांना आमदार करण्याचं गाजर दाखवलं होतं. मागच्या विधानसभेला खानापूर मतदारसंघातून भाजपचं तिकीट देण्यात आलं. तिस-या नंबरची मतं त्यांनी घेतली. त्याच दरम्यान खासदार संजयकाका पाटील यांच्याशी त्यांचं बिनसलं. लोकसभेला मदत करूनही काकांनी विधानसभेला पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप ते करू लागले. महामंडळ मिळवून देण्यातही काकांनी त्यांना साथ दिली नाही. त्यामुळं दोघं जणू ‘जानी दुश्मन’ बनले. दोन्ही गटात दोनदा हाणामारीही झाली. मधल्या काळात गोपीशेठ भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष, तर भाऊ ब्रह्मानंद जिल्हा परिषदेत सभापती झाले. वर्षभरापूर्वी काकांशी पुन्हा वाजलं आणि शेठनी भाजपला रामराम ठोकला.लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्टÑवादीशी त्यांचं जुळलं नाही, कारण सांगलीची जागा ‘स्वाभिमानी’ला गेली. जयंतराव पाटील आणि विश्वजित कदम यांनी त्यांना सोबत घेण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले. ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी विशाल पाटील यांना जाहीर झाली, त्याच दिवशी गोपीशेठ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बनले! ‘एकच छंद गोपीचंद’ ही स्लोगन घेऊन त्यांनी तीन लाखावर मतं खेचली. भाजपच्या संजयकाकांसह विशाल पाटीलना घाम फोडला.लोकसभेवेळी एकदम चर्चेला आलेला ‘वंचित फॅक्टर’ विधानसभेला सांगलीत चालेल की नाही, अशा शंकेचं मोहोळ फुटलं. कारण पक्षाचे महासचिव करूनही गोपीशेठ ‘वंचित’पासून दुरावत चालले होते. मुख्यमंत्र्यांशी त्यांचा खास दोस्ताना होताच. लोकसभा निवडणुकीत विरोधात जाऊनही तो कायम राहिला. त्यातच लोकसभेची तीन लाखावर मतं म्हणजे ‘वंचित’चा नव्हे तर गोपीशेठचा वैयक्तिक करिश्मा असल्याची कुजबूज सुरू झाली. शेठना सत्तेत जायची स्वप्नं पडू लागली. हालचाली वाढल्या. त्यामुळंच प्रकाश आंबेडकरांची सत्तासंपादन रॅली शेजारच्या सोलापूर-कोल्हापुरात आली, पण सांगलीत नाही आली. शेठ ‘वंचित’ सोडणार असल्याच्या बातमीचा इन्कार वारंवार त्यांच्या नेत्यांना करावा लागत होता. अगदी काल-परवापर्यंत ‘वंचित’वाले आणि खुद्द शेठही पक्ष सोडणार नसल्याचं सांगत होते... पण किल्ल्या फिरल्या. गोपीशेठना खानापूर, सांगोला किंवा जतमधून आमदार व्हायचंय. खानापूर हा घरचा मतदारसंघ, तर सांगोला-जतमध्ये धनगर समाजाची मोठी ‘व्होट बँक’. त्यातही खानापुरात जमेलच याची खात्री नाही. शिवाय तिथं सदाभाऊ पाटील यांचा पैरा फेडावा लागणार. सांगोल्यात गणपतआबा देशमुख रिंगणात उतरले, तर पंचाईत. त्यापेक्षा जत बरा. तिथले आमदार विलासराव जगताप भाजपचेच, पण त्यांना पक्षातून विरोध. शेठना लोकसभेला तिथून दुसºया नंबरची मतं मिळालेली. त्यामुळं आशा दुणावली. नुरा कुस्ती खेळलेल्या मुख्यमंत्र्यांकडून शब्द मिळाला की झालंच. भाजपला दिलेल्या शिव्या विसरल्या जातील आणि संजयकाकांशीही जमेल! जतमध्ये आधी चाचपणी झालीय, आता थेट तयारीच.जाता-जाता : राज्यभरातल्या धनगर समाजानं लोकसभेला गोपीशेठना तगडी रसद पुरवली. ती त्यांनी एकट्यानंच वापरल्याचं ‘वंचित’वाले म्हणताहेत. धनगर समाजानं आपल्यातलं पोरगं उभं राहिलंय म्हणून भरभरून मतं दिली. बहुजन समाजाचा चेहरा म्हणून इतरांनीही मताचं दान टाकलं. ‘फॉर्च्युनर’मधून फिरणारा ‘वंचित’ कसा, असं म्हणून काहींनी हिणवलं. लक्ष्मण मानेंनी तर शेठना महासचिव करताच शेठ आणि संभाजी भिडेंच्या संबंधावर बोट ठेवून ‘वंचित’ सोडली. शेठनी काही महिन्यांपूर्वी साऊथ इंडियन स्टाईलची मराठी फिल्म केली. चक्क हिरो बनून हिरॉईनभोवती चकरा मारल्या. सोळा-सतरा कोटीचा चुराडा झाला. आरक्षण जागृती करत राज्यभर फिरण्यासाठी शेठ हेलिकॉप्टर वापरत म्हणे! (ती रसद कुठून आली कुणास ठावूक.) हे सगळं-सगळं मागं पडलं. आता त्यांनी वंचित आघाडीचीही साथ सोडली. वर्षभरातच शपथ मोडून भाजपशी पुन्हा घरोबा करण्याचं ठरवलंय... केवळ आमदारकीसाठी.