लोकमत न्यूज नेटवर्क
लिंगनूर : ‘एक दिवस योगासाठी’ उपक्रमांतर्गत आरग (ता. मिरज) येथील कोरोना विलगीकरण कक्षात कोरोनाबाधित रूग्णांना योगाचे धडे देण्यात आले. येथील माध्यमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तेथील रुग्णांना योग प्रशिक्षक शैलेश कदम यांनी योगाचे प्रशिक्षण दिले.
कोरोनाच्या संसर्गामुळे रूग्ण खचून जातात. विलगीकरण कक्षातही निराश होतात. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अैाषधोपचारासोबतच शारीरिक व्यायाम व योगासनांची गरज असल्याचे कदम म्हणाले. नियमित व्यायाम व योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य उत्तम राहते, त्यामुळे रुग्णांनी घरी गेल्यावरही नियमित योगासने करण्याचे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाचे संयोजन ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील, संदीप नाईक, उपसरपंच विनोद बुरूड, गणेश देसाई, नारायण पाटील, सागर पाटील, आदींनी केले.