इस्लामपूर : शहरातील आधार हेल्थ केअरमध्ये मृत्यू झालेल्या महिला रुग्णावर उपचार केल्याचे दाखवून मृताच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. योगेश वाठारकर याने जामिनासाठी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या अर्जावर १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
सलीम हमीद शेख (रा. कासेगाव) यांनी डॉ. वाठारकर याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. वाठरकरच्या रुग्णालयात सायरा शेख (वय ६०) यांच्यावर उपचार सुरू होते. ८ मार्च रोजी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मात्र डॉ. वाठारकर याने ही माहिती लपवून ठेवत १० मार्चपर्यंत उपचार केल्याचे दाखवून शेख कुटुंबाची ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच मृतदेह दोन दिवस रुग्णालयात ठेवून त्याची अप्रतिष्ठा करीत विश्वासघात केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
सोमवारी (१२ जुलै) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी डॉ. वाठारकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. अतिरिक्त सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश क्र. २, राजश्री परदेशी यांच्यासमोर १४ जुलै रोजी वाठारकरच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. सरकार पक्षातर्फे जिल्ह्याचे मुख्य सरकारी वकील अरविंद देशमुख आणि सहायक जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील हे काम पाहणार आहेत.