इस्लामपूर : जादा पैशाच्या हव्यासापोटी नॉन कोविड उपचार घेणारी महिला रुग्ण मृत झाल्यावरही तिच्यावर दोन दिवस उपचार केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या डॉ. योगेश वाठारकरचा जामीन येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी फेटाळून लावला. त्यामुळे त्याची रवानगी सांगलीच्या उपकारागृहात करण्यात आली.
येथील आधार हेल्थ केअरच्या डॉ. योगेश रंगराव वाठारकार (रा. इस्लामपूर) याच्याविरुद्ध कासेगाव येथील आचारी काम करणारे सलीम हमीद शेख यांनी ७ जुलैला पोलिसात फिर्याद दिली होती. त्याच रात्री पोलिसांनी वाठारकर याला अटक केली होती. त्यानंतर येथील न्यायालयाने त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने डॉ. वाठारकर याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले.
सरकार पक्षाने तपास झाल्याचे सांगितल्याने न्यायालयाने त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर डॉ. वाठारकर याने वकिलांकरवी जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.
फिर्यादी सलीम शेख यांच्या आई सायरा हमीद शेख (६०) यांच्यावर डॉ. वाठारकर याच्या रुग्णालयात २४ फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांचे ८ मार्चला निधन झाले. मात्र डॉ. वाठारकर याने ही माहिती लपवून ठेवत मृतदेह दोन दिवस रुग्णालयातच ठेवून १० मार्चपर्यंत उपचार करत ४१ हजार २८८ रुपयांचे जादा बिल या कुटुंबाकडून वसूल केले. तसेच ही महिला १० मार्चला मृत झाल्याची बनावट कागदपत्रे तयार केली. मृतदेह दोन दिवस रुग्णालयात ठेवून त्याची अप्रतिष्ठा करत शेख कुटुंबाचा विश्वासघात आणि आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.