सांगली : छोटे पाटबंधारे व स्थानिक स्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपण शासनाचे मालक नव्हे, तर सेवक आहोत याचे भान ठेवून काम करावे. सभेत टक्केवारीचे आरोप होईपर्यंत बेजबाबदारीने अधिकाºयांनी काम करू नये, अन्यथा त्यांची जागा त्यांना दाखवावी लागेल, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी दिला. छोटे पाटबंधारेच्या अधिकाºयांचा पदभार काढा आणि स्थानिक स्तरच्या अधिका-यांना कारवाईची नोटीस पाठवा, अशी सूचनाही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिली.
जिल्हा परिषदेतील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी खा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. छोटे पाटबंधारे आणि स्थानिक स्तर विभागाच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. अधिकाºयांना टक्केवारी दिल्याशिवाय बिलच काढत नाहीत, असा आरोप जतचे सुनील पवार यांनी केला. अरुण बालटे, सरदार पाटील यांनीही, पाच वर्षे ठेकेदाराला अनामत रक्कम दिली जात नाही, जो टक्केवारी देतो त्याची लगेच फाईल मंजूर होते, सदस्यांचा दूरध्वनीही उचलत नाहीत, असा आरोप केला.
अन्य सदस्यांनीही छोटे पाटबंधारे आणि स्थानिक स्तरच्या अधिकाºयांवर निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिक स्तरचे अधिकारी तर जिल्हा परिषदेच्या बैठकीला उपस्थितच राहत नाहीत, त्यांना बैठकीला येणे कमीपणाचे वाटते का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. या तक्रारी लक्षात घेऊन खा. पाटील यांनी सर्वच सदस्यांना शांत केले व अधिकाºयांना उठून उत्तर देण्याची सूचना दिली.
छोटे पाटबंधारेचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुशीलकुमार गायकवाड म्हणाले की, कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. पण, आपण एकही काम टक्केवारीसाठी अडविले नाही.यावर खा. पाटील यांनी त्यांना फैलावर घेतले. तुमच्याविरोधात सभेत टक्केवारीचा आरोप होतो, ही गंभीर बाब आहे. कारभारात सुधारणा करा, अशी सूचनाही त्यांनी दिली. गायकवाड यांच्याकडील पदभार तात्काळकाढून घेण्याची सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना दिली.
स्थानिक स्तर विभागाकडील कार्यकारी अभियंता बैठकीला येत नसतील तर त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा. मी संबंधित विभागाचे मंत्री आणि सचिव यांच्याशी बोलून त्या अधिकाºयांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करेन. अधिकाºयांनी आपण शासनाचे सेवक आहोत, मालक नाही, याचे भान ठेवून काम केले पाहिजे, असा इशारा खा. पाटील यांनी अधिकाºयांना दिला.
- अपूर्ण कामे ठेवणा-यांवर कारवाई करा
पाणीपुरवठा योजनांची अनेक कामे अपूर्ण ठेवली आहेत. यामध्ये जिल्हा परिषद पाणीपुरवठा आणि प्रादेशिक नळ पाणीपुरवठा विभागाकडील अधिकाºयांचा समावेश आहे. येत्या आठ दिवसांत अपूर्ण कामांचा आढावा घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करून ते काम अन्य ठेकेदाराकडून करून घेण्याच्या सूचना संजयकाका पाटील यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. बनावट साहित्य वापरणाºयांना मोकळे सोडू नका. नाही तर सरपंचांवर कारवाई करून ठेकेदार, अधिकाºयांना मोकळे सोडाल, असेही त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सुनावले.